सासवने येथील करमरकरांचे शिल्प संग्रहालय !

सासवने येथील करमरकरांचे शिल्प संग्रहालय !

अलिबागपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आवास नावाचे गाव आहे. माझा जन्म या आवास गावात झाला. या आवास गावाचे एक वेगळेच वैशिष्ठय आहे. या गावाच्या एका बाजूला पूर्णपणे समुद्र आहे. गावाच्या उरलेल्या ३ सीमांवर शंकराचे देऊळ आणि प्रत्येक देवळापुढे तलाव आहे. आवासमध्ये अतिशय पुरातन असे नागाचे देऊळ आहे. बडोद्याच्या महाराजांनी बांधलेले स्वयंभू गणेश मंदिर आहे.

आवास गावातूनच पुढे २ किलोमीटर गेल्यावर सासवने या गावामध्ये जगप्रसिद्ध शिल्पकार श्री.करमरकर यांचे शिल्प संग्रहालय आहे. इतक्या छोट्या खेड्यात १८९१ मध्ये विनायक करमरकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील उत्तम गणेश मूर्तीकार होते. साहजिकच विनायकरावांच्या हातात ती कला जन्मजातच उतरली. त्यांच्या गणेशमूर्ती अधिक सुबक आणि आकर्षक बनू लागल्या. विनायकराव लहानपणापासूनच उत्तम चित्रे काढीत असत. गावातील रामाच्या देवळाच्या भिंतीवर त्यांनी अश्वारूढ शिवाजीमहाराजांचे अप्रतिम चित्र रेखाटले होते. त्यावेळचे ब्रिटिश कलेक्टर रॉथफील्ड हे गावाच्या दौऱ्यावर आले असता हे चित्र पाहून ते अचंबित झाले. त्यांना चित्रकलेची चांगली जाण असल्याने त्यांनी विनायकला मुंबईतील जे.जे स्कूलमध्ये दाखल केले. तेथील खर्च करमरकरांना परवडत नसल्याने तो सर्व खर्च या कलेक्टरने केला.

विनायकरावांनी या संधीचे सोने केले. तेथे ते पहिले आले. नंतर सरकारने त्यांना पुढील शिक्षणासाठी विदेशात पाठविले. पुतळे आणि मूर्ती बनविण्यात ते अत्यंत वाकबगार झाले. महाराष्ट्रातील पहिला शिव पुतळा त्यांनी घडविला. त्या पुतळ्याचे खूप कौतुक झाले. नंतर त्यांनी शेकडो उत्तमोत्तम पुतळे घडविले. १९६४ साली त्यांना पद्मश्री या किताबाने सन्मानित करण्यात आले.
या सासवने येथील त्यांच्या बंगल्यात त्यांनी बनविलेल्या अप्रतिम पुतळ्यांचे संग्रहालय तयार केले आहे. येथील एकेक पुतळा म्हणजे एकेक कथा आहे. त्यांच्याकडे काम करणारी एक बाई, गणपतीमध्ये तिच्या गावाला जाणारी एसटी पकडण्याच्या जय्यत तयारीमध्ये बसली होती. करमरकरांनी तिला तसेच बसायला सांगून तिचा पुतळा बनवायला घेतला आणि एका अप्रतिम कलाकृती साकारली. पण यामुळे तिची एसटी चुकली म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या स्वतःच्या कारने तिला तिच्या तळ कोकणातील गावी पोचते केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे येथे पाहायला मिळतात. महात्मा गांधी, जमशेदजी टाटा, लोकमान्य टिळक, मामा वरेरकर, शांता आपटे अशा थोरांबरोबरच त्यांनी आपल्या घरच्या सर्व नोकरांचे,पाळीव प्राण्यांचे अतिशय रेखीव पुतळे बनविले आहेत.एखाद्याने फॅमिली फोटो अल्बमसाठी आपल्या नातेवाईकांचे फोटो काढावेत इतक्या सहजतेने करमरकरांनी आपल्या सर्व नातेवाईकांचे पुतळे बनविले आहेत. त्यांना कला शिक्षणाची संधी देणारा कलेक्टर रॉथफील्ड यांचा पुतळा त्यांनी घडविला आहे.शंखध्वनी हे शिल्पही वेगळेच आहे.

शंख फुंकणे ही खरेतर भारतीय उपखंडातील कला ! येथील शिल्पामध्ये युरोपीय nude स्त्री शंख फुंकताना दिसते. अंगावर फक्त कुंची घातलेल्या आपल्या बाळाला नमस्कार करायला शिकविणारी आई, हिरा कोळीण, आपल्या लहान भावाला अक्षरश: टेंगणावर बसवून अन्य दोन भावंडांना सांभाळणारी मुलगी, येणाऱ्यावर नजर रोखून बसलेला कुत्रा, निवांत बसलेली म्हैस….. प्रत्येक पुतळा जिवंत आणि वैशिष्ठयपूर्ण आहे. महात्मा गांधी हे शेंडी ठेवत असत हे करमरकरांनी शेंडीसह बनविलेल्या पुतळ्यावरून लक्षात येते.
करमरकर यांच्या सुनबाई श्रीमती सुनंदा करमरकर या संपूर्ण जग फिरून आलेल्या आहेत. साक्षात विश्वकर्म्याचा आशीर्वाद लाभलेल्या आपल्या सासऱ्यांचा हा सर्व अप्रतिम संग्रह त्या इतक्या आडगावात राहून त्या सांभाळतायत. त्यांचे वय ८४ वर्षे असून त्या खूपच उत्साही आणि बोलक्या आहेत. अधिकाधिक लोकांनी हा संग्रह पाहावा असे त्यांना वाटते. तेथे काम करणाऱ्या आणि शेतकरी असलेल्या आपल्या गरीब कर्मचाऱ्यांना त्यातून काही मिळावे अशी त्यांची इच्छा असते.

अलीकडे येथे एक अक्षम्य अशी नवीनच डोकेदुखी उद्भवली आहे. येणारे कांही अतिउत्साही प्रेक्षक ( ? ) म्हशीच्या पुतळ्यावर बसून सेल्फी / फोटो काढतात. म्हणून त्यांनी या म्हशीच्या पुतळ्याभोवती कुंपण घातले. पण त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेऊन जेव्हा प्रेक्षक सेल्फी काढू लागले तेव्हा मात्र संताप होतो. आता महाराजांच्या पुतळ्यालाही कुंपण घालायचे का ? ज्या महाराजांच्या पायाशी आपण शोभतो, त्यांच्या खांद्यावर हात ठेवायचा ? यावर काय बोलायचे ? मला वाटते हल्ली शिक्षण घेऊन माणूस शिक्षित होतो पण सुसंस्कृत होत नाही.
कलेचा आस्वाद कसा घ्यावा याचेही शिक्षण देण्याची वेळ आली आहे.

माहिती साभार – Makarand Karandikar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here