धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २९

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २९

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २९…

चिमणाजी आणि बाळाजी नऱ्हेकर राजगड चढत होते. त्यांच्यापासून सर्जराव जेधे, नेताजी, मोरोपंत, तान्हाजी यांनी घेर धरलेली राजांची पालखी गड चढून येत होती.

पाली दरवाजावरची गडचढीची नौबत दुडदुडली. जिजाबाई बाळराजांना घेऊन बालेकिल्ल्याच्या दरवाजापर्यंत राजांना सामोरे जाण्यासाठी आल्या. रामनवमी होऊन पाच दिवस झाले होते कुणाच्या ध्यानीमनीही नसेल, असा अजब हिमतीचा हुन्नर लढवून राजांनी शास्ताखानाच्या कोलदांडा एकाच झटक्यात पुण्याच्या तळावरून उखडून काढला होता कोंढणा सोडून राजे कात्रजच्या रानात गेले. त्यांनी पुण्याच्या उगवतीला नेताजी ब मावळतीला मोरोपंत यांच्या घोडदळाच्या फौजफळ्या पेरल्या. चखोट, निवडक असे

कुल शे-दीडशे पटेकरी संगती घेतले. वेष पालटून खासे राजे आणि त्यांचे धारकरी एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर रणहलग्यांच्या तालावर लेझीम खेळत पुण्यात शास्ताखानाच्या ऐन गोटात घुसले.

लालमहालाचा कानाकोपरा माहीत असलेल्या राजांचे बालपणीचे खेळगडी चिमणाजी आणि बाळाजी बरोबर होते. रमजानच्या उपवासाने शास्ताखान आणि त्याचे खिदमतगार रात्री निसूर होणार; हे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते. मध्यरात्रीनंतर एका खिडकीचे कुसव उकलून राजे, चिमणाजी आणि बाळाजी यांचे संगती पाठीवर नंगी हत्यारे पेललेल्या मावळ्यांच्या फळ्या घेऊन लालमहालात घुसले. कापाकापीला तोंड फुटले. बेभान झालेले राजे दालनांमागून दालने मागे टाकीत शास्ताखानाने ‘ख्वाबगाह’ म्हणून निवडलेल्या दालनात घुसले. आणि टप्प्यात आलेला शास्ताखान एका वारातच जीवे घ्यावा म्हणून राजांनी डोळे विस्फारून हत्यार उचलून टाकोटाक वार केला, पण खानाने तेवढ्यात जिवाच्या आकांताने खिडकीतून छलांग घेतली. राजांनी केलेला वार खिडकीची महिरप पकडलेल्या खानाच्या हातावर सपकन उतरला! त्याच्या तीन बोटांच्या बिन्नीच्या पेरांचे कंडके करून हत्याराचे पाते लाकडी महिरपीत रुतले! महिरप लाल करीत खानाच्या बोटांची पेरं फरसबंदीवर उतरली!

“या अल्ला!” म्हणून भयानक किंचाळत, ठिबकता हात झटकीत खान भिंतीच्या कडेकडेने वाकून पसार झाला. खानाचा बन्चा अब्दुल फत्ते या छाप्यात जीवे मारला गेला.

जनानखान्यातील कैक रंगील्या बाहुल्या अंधारामुळे मावळ्यांनी गफलतीने कापून काढल्या. काही मावळे धारकरीही कामी आले. या धुंदळीची खबर भोवतीच्या गोटाला आता लागते आहे, हे हेरून राजांनी साऱ्यांना परतीचा इशारत केली

“गनीम भाग गया! शैतानकी नस्ल पिछा करो! दीन दीन!” असे म्हणत राजांच्यासह मावळे धारकरीच लालमहालाच्या पिछाडीने बाहेर पडले!

कोंढाण्याच्या रोखाने बेभान दौडू लागले. पाठलागावर पडलेल्या गनिमाच्या घोडदळाला हूल देण्यासाठी काही बैलांच्या शिंगांना पेटते पलोते बांधून ते बैल राजांनी कात्रजघाटाच्या रोखाने पिटाळायला लावले!

आणि राजे आडवाटेने कोंढाण्यावर सलामत पोहोचले.

लालमहालाच्या या छाप्याची हवी तशी छाप शास्ताखानावर पडली. तिसऱ्या दिवशीच पुण्याचा तळ जसवंतसिंगावर सोपवून शास्ताखानाने धास्त घेऊन पुणे सोडले. तीन वर्षे पुण्यात तळ टाकून, राजांचे दोन गड जिंकून, त्याबद्दल तीन बोटे गमावून, छाप्यानंतर तीनच दिवसांत खान पुण्याहून हलला!

बालेकिल्ला चढून आलेल्या राजांनी पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावला. शंभूबाळांनी पुढे होऊन राजांच्या आजानुबाहू हाताचे बोट पकडले. त्यांचा छोटेखानी

हातपंजा आपल्या हातात घेत राजे हसून म्हणाले, “बाळराजे, आम्हास आख्खा नारळ नाही काढता आला हुडव्याबाहेर! फक्त शेंडीच हातास आली!”

शंभूबाळांच्या शिवगंधाला आठी पडली तसे राजांनी हसत त्यांची छोटी बोटे अत्यंत ममतेने हळुवार थोपटली!!! आणि लालमहालातील शास्ताखानाच्या हातची तीन बोटे कशी कापली, याची हकिगत त्यांना सांगितली.

वैशाख आला. उन्हे तावणीला पडली. एका सकाळी बालेकिल्ल्यावरच्या पटांगण चौकात गोमाजीबाबा बाळराजांना काळ्या, घोटीव दगडी मल्लखांबावर दशरंग

फिरकीचा सराव देत होते. कमरेला छोटेखानी भगवी जांग असलेल्या शंभूबाळांनी उघडे अंग पिकल्या लिंबाच्या वाणाने तळपत होते. गोमाजींनी आधारीच हातजोड देऊन बाळराजांना मल्लखांबावर चढते केले. पिवळाधमक धामणसर्प कळकीच्या सोटावर गरगरते चलाख वळसे भरत चढावा तसे शंभूबाळ दशरंग फिरत मल्लखांबाचा बुंधा पार करीत सरासर वरच्या टोकापर्यंत चढले. खांबाच्या गळपट्टीला दोन्ही मांड्यांची कैची घालून त्यांनी हुशारीने नजर वर केली. त्यांना समोर बालेकिल्ल्याच्या सदरमहालाबाहेर पडणारे राजे दिसले! त्यांच्यामागून दोरोजी, नेताजी, येसाजी, तान्हाजी अशी मंडळी बाहेर पडत होती.

टाकोटाक झेप टाकून झटाझट उतरते दशरंग फिरत शंभूबाळ छलांग घेऊन मल्लखांबावरून भुईवर उतरले. पाय टेकताच राजांच्या रोखाने थेट दौडत सुटले!

“अवं धाकलं राजं, दम खा!” म्हणून हात पसरीत मागून साद घालणाऱ्या गोमाजीबाबांकडे त्यांचे ध्यानच नव्हते.

बालेकिल्ल्याच्या सदरदरवाजाजवळ आलेल्या राजांना बाळराजांनी धापावता ऊर घेऊन गाठले. उघड्या अंगाच्या सतेज शंभूबाळांना सामने बघताना राजांना क्षणभर

वाटून गेले की, “आमचे काळीजच कुणीतरी सोनरसात बुडवून आपल्या सावळ्या हातांनी आमच्यासमोर पेश केलं आहे!!’ राजांच्या मांड्यांना मिठी भरत बाळराजे लाघवी आर्जवाने म्हणाले, “आम्ही येऊ तुमच्या संगती धावणीला, आबासाहेब?”

राजांना पेच पडला. ते कोकणस्वारीवर जाण्यासाठी गड उतरणार होते. शंभूबाळांच्या काळ्या-कुरळ्या, दाट केसावळीतून आपली अंगठीधारी सडक बोटे मायेने फिरवीत राजे म्हणाले, “आम्ही जरूर नेऊ तुम्हास धावणीला. पण अजून थोडे जाणते व्हा! जा. गोमाजी खोळंबलेत. मेहनत घ्या.” राजांचे पाय शिवण्यासाठी शंभूबाळ झुकते झाले.

आपल्या महालाच्या गवाक्षातून त्या दोघा पितापुत्रांना तसे बघताना जिजाबाई स्वत:शीच म्हणाल्या, “आमच्या या वैभवास कधी कुणाची दृष्ट न लागो, आई अंबे!”

आणि तेच दृश्य आपल्या महालातून बघताना सोयराबाई स्वत:शी म्हणत होत्या, “बाळराजांना अदब कसली ती नाहीच!! सिधे उघडे स्वारींच्या समोर गेले, पण लबाड

दिसतात मात्र गोमटे. स्वारींची नको ती याद देतात!” आणि शेवटच्या चटक्याने सदरदरवाजाबाहेर पडणाऱ्या राजांच्याकडे सोयराबाई स्वत:ला हरवून नुसत्या डोळाभर

बघतच राहिल्या!!

दसऱ्याचे पानसोने लुटून होताच राजांनी आपले कर्माजी, बहिर्जी, विश्वास, महादेव असे खबरगीर औरंगजेबाच्या गुजराथ सुभ्यात बेमालूम पेरले. त्यांनी मावळतीच्या दर्याला धरून असलेल्या सुरत बंदराची सारी सोनसूरत आपल्या चखोट नजरेने हेरून खडान्खडा खबर राजांच्या कानांत अल्लाद आणून सोडली. दर्याला धरून शाही सुरत विसावली होती. समुद्रमंथनातून बाहेर पडताच

विसावलेल्या संपन्न लक्ष्मीसारखी! राजांनी मोठाच मातब्बर मनसुबा रचला. सुरत लुटीचा!!

त्यासाठी पुण्यात तळ टाकून पडलेला जसवंतसिंग, एका बगलेला काढल्याशिवाय सुरतेची वाट बिनघोरी होणार नव्हती. राजांचे कोंढाण्यावरचे मावळे जसवंतसिंगाच्या

पुण्यातील गोटावर दिवस-रात्र धाडसी छापे घालू लागले. चिडलेल्या जसवंतसिंगाने फौजेनिशी पुणे सोडले आणि कोंढाण्यालाच वेढा भरला! सुरतेची वाट मोकळी झाली!

शास्ताखानावरच्या छाप्याने एक विचित्र अफवा सगळीकडे पसरलीच होती, “शिवाजीला एक चेटूक सायवळ झाले आहे! तो पाहिजे तेव्हा ‘गायब’ होतो आणि मन चाहेल तेव्हा आणि तिथे अचानक “खडा” होतो!

खरोखरच राजांना चेटूक वश झाले होते! सह्याद्रीच्या काळ्या कातळांचे आणि इमानबंद मावळ्याच्या कसदार काळजांचे चेटूक राजांना वश झालेच होते!! त्यांच्या

जोरावर राजे आता “गायब’ न होता फक्त “प्रकटच?’ होणार होते. मन चाहेल तिथे!

क्रमशः- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २९

 

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here