Durgbharari Teamमहाराष्ट्राचे वैभवमहाराष्ट्रातील गडकिल्ले

अंजनेरी

अंजनेरी

जिल्हा – नाशिक
श्रेणी  – मध्यम
दुर्गप्रकार – गिरीदुर्ग

नाशिक जिल्ह्य़ांइतकी दुर्गसंपत्ती आपल्याकडे अन्य कुठल्याही जिल्ह्य़ात नाही. सातवाहना पासूनचा इतिहास इथे घडला आणि आपल्या पुराणकथाही येथील पर्वतांना चिकटल्या. अंजनेरी गड म्हणजेच रामायणामधील सुप्रसिद्ध ऋष्यमूक पर्वत. वायुपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर झाला व अंजनीमातेच्या नावावरून या गडाचे नाव अंजनेरी पडले अशी लोकांची श्रध्दा आहे. समुद्र सपाटीपासून ४००० फुट तर पायथ्यापासून २५०० फुट उंचीवर असणारा अंजनेरी किल्ला भास्करगडापासून सुरु होणाऱ्या त्र्यंबकेश्वर रांगेतील एक महत्त्वाचा किल्ला होता.

किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावात आजही १६ पूरातन मंदि्रे आणि शिलालेख असुन यातील ४ मंदिरे हिंदु देवतांची तर १२ मंदिरे जैन देवतांची आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर नाशिक पासून २३ किलोमीटर अंतरावर अंजनेरी गावाचा फाटा आहे. येथे हनुमंताची भली मोठी मूर्ती असलेले एक मंदिर आहे. या मंदिरा शेजारून एक वाट टेकडीवरील अंजनेरी गावात जाते. अंजनेरी गडाचे साधारणपणे तीन भाग पडतात. पहिला भाग म्हणजे गडाचा पायथा. अंजनेरी गावातून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता बनवलेला आहे. तिथपर्यंत खाजगी गाडी जाऊ शकते. दुसरा भाग म्हणजे गडाची माची अथवा पठार. पठारावरील अंजनीमातेच्या मंदिरापर्यंत जायला पायऱ्या व पायवाट आहे. इथुन गडाचा तिसरा भाग म्हणजे गडाचा बालेकिल्ला. तिसऱ्या भागातील गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.

अंजनेरी गाव ओलांडून एक कच्चा रस्ता किल्ल्याकडे जातो. किल्ल्याच्या आजूबाजूला दिसणारे नवरा-नवरी व सासू असे सुळके बघत आपण किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या वनखात्याच्या चौकीपाशी येऊन पोहोचतो. पायथ्याशी येताच डोंगराची विशालता आपल्या डोळ्यात भरते. मुख्य डोंगररांगेला चिकटलेली दक्षिण बाजू सोडल्यास टेंकडीच्या सर्वच बाजूस ताशीव कडे असल्याने या किल्ल्याला तटबंदीची तशी गरज पडली नाही. वनखात्याच्या चौकीपासून किल्ल्यावर जाणारा पायरीमार्ग सुरु होतो. काही जुन्या तर काही नवीन पायऱ्या चढत किल्ल्याची उभी चढण सुरु होते. येथेच काही ठिकाणी सुरक्षेसाठी वनखात्याने रेलिंग लावलेली आहे. कड्याच्या पायथ्याला वळसा घालून आपण दर्शनी भिंत आणि अंजनेरीचे पठार यांच्या मधल्या घळीत पोचतो. घळीच्या वाटेवर कातळावर रंगवलेली हनुमान मूर्ती दिसते. चढाईच्या या टप्प्यात समोर खोदलेली एक नाळ दिसते. या नाळेत पायऱ्या खोदलेली प्राचीन वाट होती परंतु आता सिमेंट काँक्रिटच्या पायऱ्या केल्याने हि वाट झाकली गेली आहे. या पायऱ्या अर्ध्या उंचीपर्यंत चढून गेल्यावर डाव्या बाजूला एक छोटी गुहा व जमिनीपासून १० फुट उंचीवर या गुहेत जाण्यासाठी खोदलेल्या पायऱ्या दिसतात.

पार्श्वनाथ दिगंबर जैन १००८ यांची ही गुहा आहे. या लेण्यात दोन दालने असुन बाहेरच्या दालनात भैरव आणि हनुमानाचे शिल्प तर छतावर अर्ध्या मीटर व्यासाचे कमळपुष्प कोरलेले आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वारावर नागशिल्प, कीर्तिमुख आणि अन्य भौमितिक आकृत्यां कोरल्या आहेत तर दोन्ही अंगांना द्वारपालांची रचना आहे. आतील दालनात मधोमध पद्मासनातील पार्श्वनाथाचे अर्धा मीटर उंचीचे शिल्प आणि दोन्ही बाजूंना अन्य दहा मूर्ती आहेत. गर्भगृहातील या शिल्पाशेजारी एक संस्कृत शिलालेख आहे जो या लेण्याची माहिती देतो. सौन्देव राजाच्या मंत्र्याने इ.स.११४१ मध्ये या लेण्यासाठी देणगी दिली. राजाश्रयातून खोदली जाणारी लेणी आणि किल्ले यांचे नाते इथेही दिसून येते. लेण्याच्या बाजूला पाण्याचे कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. हे लेणे पाहून उरलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण एका विस्तिर्ण पठारावर पोहोचतो. समोरच आपल्याला अंजनेरी किल्ल्याचा भव्य बालेकिल्ला दिसू लागतो. किल्ल्याचा माचीचा हा परिसर म्हणजे एक भव्य पठार आहे. माचीवर जेथे आपला गडप्रवेश होतो तिथे खालील बाजुस भग्न तटबंदी व दरवाज्याचे अवशेष डोळसपणे शोधावे लागतात.

किल्ल्याच्या या पठारावर अनेक बांधकामांचे अवशेष विखुरलेले आहेत. माचीववरून बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेने चालू लागल्यावर १५ मिनीटात आपण अंजनीमातेच्या मंदिरात पोहोचतो. घडीव दगडात बांधलेले अंजनी मातेचे मंदिर प्रशस्त व मुक्काम करण्यासाठी योग्य आहे. मंदिरात नवीन बसवलेली अंजनी मातेची व समोर नतमस्तक झालेल्या हनुमानाची मूर्ती आहे. मंदिरासमोर एक आणि मंदिराच्या उजव्या बाजूला एक अशी दोन पाण्याची टाकी याठिकाणी आहेत पण दोन्ही टाकी कोरडी आहेत. मंदिराजवळ खाण्याचे आणि पूजा साहित्याची दोन दुकाने आहेत. येथे जेवणाची सोय होते. अंजनी मातेच्या मंदिरापासून तशीच मळलेली पायवाट पुढे एका मोठया तलावापाशी जाते. हा तलाव हनुमानतळे आणि इंद्रकुंड या नावाने ओळखला जातो. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची फक्त इतकीच सोय आहे. हे तळे वर्षभर पाण्याने भरलेले असते. त्याच्या काठावर अनेक घरांची जोती दिसतात. या बांधकामासाठी वापरलेल्या चुन्याच्या घाणीचे चाकही इथे पडलेले आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी दोन वाटा लागतात. तळ्यापासून उजवीकडे वर जाणारी वाट अंजनेरीच्या बालेकिल्ल्यावर जाते तर डावीकडील दाट झाडीत जाणारी वाट माचीवरील आश्रमाकडे व सीता गुंफेकडे जाते.

आपण प्रथम डावीकडील पायवाट धरून आश्रमाकडे चालायला लागायचे. आश्रम परिसरात हल्लीच बांधलेली हनुमान, गणपती व दत्ताची छोटी मंदिरे आहेत. आश्रमाजवळून जाणाऱ्या पायवाटेने कातळात कोरलेल्या सीता गुंफेकडे जाता येते. बालेकिल्ल्याच्या कड्यातच सीता गुंफा कोरलेली असुन लेण्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपालाच्या भूमिकेत एक कुटुंबच उभे आहे असे वाटते. लेणे दोन दालनांचे असुन लेण्याच्या भिंतींवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पांचा दर्जा पाहता ती नंतरच्या कालखंडात कोरलेली असावीत असे वाटते. अंजनीमातेने याच गुहेत हनुमानाला जन्म दिला अशी श्रद्धा आहे. आश्रम व सीता गुंफा परिसराची भटकंती करून पुन्हा हनुमान तळ्यापाशी परत यायचं आणि उजवीकडे जाणारी बालेकिल्ल्याची वाट चालू लागायची. पायऱ्यांची ही वाट म्हणजे खडी चढाई असुन वनखात्याने येथे रेलिंग लावलेल्या आहेत. बालेकिल्ल्याचा डोंगर चढताना साधारण पाऊण उंचीवर गेल्यावर डाव्या बाजूला एक पायवाट एका गुहेकडे जाते. त्या वाटेवर हनुमान जन्मस्थान अशी पाटी आहे. या पायवाटेने पुढे गेल्यावर एक प्रशस्त गुहा पाहायला मिळते. गुहेच्या बाहेर झाडावर घंटा टांगलेली असुन गुहेपाशी गदा आणि गुहेमध्ये अंजनी मातेची शिळासदृश मूर्ती आहे. टेहळणीसाठी या गुहेचा उपयोग होत असावा.

मुक्कामी ट्रेक असला तर १०-१२ जण या गुफेत राहू शकतात. सध्या एका साधूने यात आपले बस्तान बसवलेले असुन गुहेच्या पुढे एक पाण्याचे टाकेही त्याने बनवलेले आहे. गुहा पाहून परत पायऱ्यापाशी येऊन वर चढल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. माचीच्या पठाराप्रमाणे बालेकिल्ल्याचे पठारही विस्तीर्ण आहे. पठारावरून १० मिनिटे चालल्यावर आपण हनुमानाच्या मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिरात अंजनी मातेच्या मांडीवर बालहनुमान बसलेला दाखवला आहे. मंदिराच्या बाजूला एक पाण्याचे बांधीव टाके आहे. मंदिरासमोर व शेजारी उघड्यावर काही मुर्ती आणि पिंड ठेवलेली असुन मंदिरामागे उध्वस्त इमारतींचे चौथरे आहेत. याठिकाणी आपली गडफ़ेरी पूर्ण होते. गडाचा विस्तार प्रचंड असून त्यावर इतर कोणतेही अवशेष नाहीत मात्र येथून सभोवतालचा परिसर फार सुंदर दिसतो. अंजनेरी गावातून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी दॊन तास लागतात. वरून जवळच असणारा ब्रम्हगिरीचा डोंगर आणि दुर्गभांडार नजरेस पडतात.

ब्रम्हगिरीच्या मागे त्र्यंबकरांगेतले हर्षगड व बसगड हे किल्ले तर ब्रम्हाडोंगर आणि उतवडचा डोंगर दिसतात. दुसऱ्या बाजूस डांग्या सुळका, रांजणगिरी, गडगडा, बहुला, वाघेरा, सोनगीर, खैराई असे अनेक दुर्ग दिसतात. पूर्ण किल्ला फिरायला आणि व्यवस्थित पाहायला अंजनेरी गावातून ६ ते ७ तास लागतात. किल्ल्यावर दिवसा आल्यास दुकानातुन जेवणाची व्यवस्था होते पण रात्री गडावर ते थांबत नाही. अंजनेरी किल्ल्याचा इतिहास शोधताना मूळात त्याच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावाचा भूतकाळ विचारात घ्यावा लागतो. अंजनेरी हे प्राचीन काळापासून एक राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे केंद्र होते. यादवांच्या काळात या परिसराचे महत्त्व आणखी वाढले. या प्राचीन कालखंडाचे अवशेष आजही गावात आढळतात. अंजनेरीत हिंदू आणि जैनांची प्राचीन सोळा मंदिरे आहेत. अशा या प्राचीनकाळी भरभराटीला आलेल्या अंजनेरी नगरीच्या आधारासाठीच तर हा किल्ला निर्माण झाला. गडावरील प्राचीन खोदकाम व अंजनेरीच्या पायथ्याशीं असणारे मंदीर समूह पाहता राष्ट्रकूट- चालुक्यांच्या काळापासून हा गड नांदत असावा. इ.स. २६०च्या सुमारास अंजनेरी ही या भागात राज्य करणाऱ्या ईश्वरसेन (वीरसेन) या अभिर गवळी राजाची राजधानी असल्याचा कोरीव लेख पांडवलेण्यात आहे. त्यांची चांदीची नाणीही उपलब्ध आहेत. याशिवाय अंजनेरी परिसरात मिळालेल्या दोन ताम्रपटातही या किल्ल्यावर इ.स. ७१० मध्ये बदामीच्या चालुक्यांची हरिश्चंद्रवंशीय घराणे राज्य करत होते याचे उल्लेख आले आहेत.

इ.स. ७१० च्या ताम्रपटात अंजनेरी जवळच्या विविध देवालयांसाठी परिसरातील गावांवर बसवलेल्या करांचा उल्लेख आहे. सिन्नर येथील यादव राजांच्या काळात सेऊणचंद्र ३ रा याने इ.स.११३० ते ११४५च्या सुमारास अंजनेरीहून काही काळ कोकणचा कारभार पाहिला होता. त्यांच्या कारकिर्दीत ११४१चा शिलालेख उपलब्ध आहे. अंजनेरी आणि परिसराला जैन परंपरेत श्वेतप्रद असे म्हणत. इ.स. १०-११ व्या शतकात यादवांच्या काळात या परीसरात अनेक ठिकाणी लेण्या कोरल्या गेल्या. पुढे मुस्लीम सत्तांच्या काळातही अंजनेरीचे उल्लेख येतात. १५०८ ते १५५३ याकाळात हा गड अहमदनगरच्या बुऱ्हाण निजामाकडे होता. निजामशाहीने अल्पवयीन निजामशहाला या किल्ल्यावर काही काळ सुरक्षित ठेवले होते असा उल्लेख येतो. शिवकाळात मोरोपंत पिंगळे यांनी इ.स. १६७० ऑक्टोबरमध्ये त्रिंबकगडाबरोबर अंजनेरी किल्ला स्वराज्यात आणला. मोगल-मराठा संघर्ष काळात अंजनेरी किल्ल्याचे त्रोटक उल्लेख येतात. पुढे १७५० मध्ये हा गड निजामाच्या ताब्यात गेला. पेशवे काळात राघोबादादा यांनी गडावरील सपाटी आणि हवामानाची भुरळ पडून मुक्कामासाठी गडावर एक वाडा बांधला. मराठय़ांनंतर इंग्रज अधिकारीही गडावर राहण्यासाठी येत असत. इंग्रजांनी हनुमान तळ्याच्या काठावर थंड हवेचे ठिकाण म्हणून एक बंगला बांधला होता त्याचे अवशेष आजही दिसतात.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
www.durgbharari.com
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Website आणि Android App चा हेतू महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी हा आहे.
आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.

लेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close