इतिहासदिनविशेष

४ फेब्रुवारी १६७०

४ फेब्रुवारी १६७०

द्रोणागिरीच्या कड्याखालच्या गर्द रानात काजळ रातीला कसलीशी हालचाल होती.
तेवढ्या भयाण रातीला काय होतं त्या निबिड अरण्यात?
वाट चुकलेलं हरणाचं पाडस की कोणी गडी-माणूस,
ह्या भागात रान एवढं गर्द, माणूस काय जंगली प्राण्याचीही छाती नाही इकडे फिरकायची.
वेताळाची पालखी तर नसावी?
एवढ्या अवेळी भुताटकीच असणार असल्या अवघड जागी.
भुतं नव्हती ती, भूत्यांची टोळी होती ती, सह्याद्रीच्या शिवसांबाची भुत्ये. छत्रपती शिवरायांचे मावळे.
असलं दुर्घट काम तेच करू जाणोत.
बघता बघता,कड्यात बोटं रुतवून एक मावळा चढलाही सिंहगडाच्या कपाळी.
कड्याच्या बेचकीत मेख मारून दोर डकवला आणि फेकला तो दोर दरीत.
अर्धी लढाई मारली मरहट्यांनी, कड्याखालचा हरेक मावळा बेमालून गड दाखल झाला.
______________________________

क्काय, मरहट्टे आणि गडावर?
कधी, कसे, किती, कुठे.
एक ना दोन हजार प्रश्नांचे मोहोळ उठले मोंगली गोटात.
मोंगली बाजारबुणग्यांच्या अंगातून भीतीची थंडगार शीरशिरी दौडली.
भेलकांडत भाले-बरच्या सावरल्या मोंगली सैन्यांनी.
कोणीतरी गवताची गंजी पेटविली, आगीचा रसरसता लोळ आकाशी झेपावला.
जर्द लाल-पिवळ्या उष्ण प्रकाशात सिंहगडाचा पर्वत तेजाळला.
आता पळं दवडण्यात अर्थ नव्हता, अजस्त्र कडा तुटावा असा घनघोर आवाज आसमंतात पसरला,
“हर हर महादेव.”

मराठयांच्या तलवारी झेपावल्या गनीमाच्या रक्तात तावायला.शिवरायांनी शेतकरी हातात तलवारी पेरलेल्या, शेतात सहजी कणसं खुडावीत तद्वत मराठे गनीम खुडत होते.
तानाजी-सूर्याजी आणि सत्तरी उटलेले शेलार मामांनी तर शर्थ मांडली. आकाशीची विद्दुलताच जणू त्यांच्या तलवारीत उतरलेली. त्यांच्या तलवारीनं चौफेर जे तेजोमंडळ बनवलेलं, त्यात घुसणं त्यावेळी साक्षात भृकुटी भयंकर यमराजालाही शक्य नव्हतं.
तिकडं राजसदरेच्या सज्जातून राजांची नजर सिंहगडा कडं लागली व्हती,
इथून मागं बी कोंडण्यानं स्वराज्यातं येता येता जीव मेटाकुटीला आणला व्हुता अन आज जीवाचा मैतर तिथं जीवाची बाजू लावून उभा ठाकला होता जीवाच्या बाजीनं लढला, पडला पण गड फत्ते झालाच.

Discover Maharashtra Team

महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close