महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 92,68,419

समर्थ रामदास स्वामींनी स्थापिलेले ११ मारुती

Views: 142
7 Min Read

समर्थ रामदास स्वामींनी स्थापिलेले ११ मारुती

“जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा”!.. असे सुंदर वचन मनाच्या श्लोकात  लिहिणारे समर्थ रामदास स्वामी यांचे उपास्य दैवते म्हणजे श्रीराम व मारुतीराया. अंगापूरच्या डोहात पोहत असताना सापडलेल्या राममूर्तींची स्थापना चाफळ येथे करून सुंदर मंदिर रामदास स्वामींनी बांधले. तसेच अकरा मारुतीची ही स्थापना विविध गावात केली.. श्रीराम मंदिरे, मारुती मंदिरे, राम उपासना केंद्रे, मठ , उपासनेसाठी घळी, गुहा, यांच्या स्थापना करून समाजाला शांत , नैसर्गिक ठिकाणी चिंतन करण्यासाठी व आध्यात्मिक मार्गाची योग्य दिशा व प्रेरणा दिली. दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम, अशा सारख्या साहित्य निर्मितीतून लोकांचे ज्ञानात भर घातली व प्रबोधन केले.(समर्थ रामदास स्वामींनी स्थापिलेले ११ मारुती)

महाराष्ट्रास संतांची मांदियाळी असलेला प्रदेश म्हणतात. या संत गणात रामदास स्वामींचे कार्य खूप मोठे आहे. एकदा समर्थ रामदास स्वामी बहे या गावी कृष्णा नदी किनारी कातळावर ध्यानस्थ बसले होते. बहे हे गाव सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात नरसिंगपूर या गावाशेजारी कृष्णा नदी किनारी आहे. फार पूर्वी अशी आख्यायिका आहे की ,या ठिकाणी श्रीराम, सीतामाई ,लक्ष्मण व हनुमंत आले होते त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. श्रीराम व सीतामाई यांच्या दर्शनाच्या ओढीने कृष्णाबाई खूप जोरात खळखळत येऊ लागली. तिच्या पाण्याचा वेग खूप वाढला होता. तिला थोपवण्यासाठी हनुमंताने आपले दोन्ही बाहू पसरून तिला अडवले व हळुवारपणे कातळाच्या दोन्ही बाजूने शांतपणे वाहून जाण्यास सांगितले. कृष्णामाई पण नम्रतेने दोन्ही बाजूने वाहत पुढे निघून गेली. याच जागी रामदास पुढे ध्यानस्थ बसण्यास आले होते. त्यावेळची सामाजिक व राजकीय परिस्थिती खूपच बिकट झाली होती.अस्मानी सुलतानी संकटातून जाणारा आपला हिंदुस्थान याची चिंता समर्थांना खूप जाणवत होती. सतावत होती. त्यांचे ध्यानस्थ मन सैरभैर झाले होते. काळजीने ते ग्रस्त झाले होते. त्यांच्या मनात विचार आले,

“नव्हे कार्यकर्ता भूमिभार झालो|

तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो.||

असे आर्ततेने,विषण्णतेने, आपल्या दैवतांची ते आराधना करू लागले. आपल्या भक्ताची ती कळकळ ऐकून प्रत्यक्षात मारुतीरायांचा त्याना साक्षात्कार झाला… पुढ्यात प्रत्यक्ष हनुमंतच उभे ठाकले

“प्रभू रामचंद्रांनी मला पाठवले आहे . तू अजिबात काळजी करू नकोस उदास होऊ नकोस असे आश्वासन देऊन हनुमंताने त्यांना पाण्यात बुडी मारायला सांगितली व हाताला जे येईल ते घेऊन यायला सांगितले. समर्थांनी पाण्यात उडी मारली व हातात अकरा खडे घेऊन ते वर आले. हे ११ खडे म्हणजे माझ्याच विभूती आहेत.माझ्या ११ ठिकाणी मूर्ती स्थापन कर. असा आशीर्वाद हनुमंतरायांनी स्वामी रामदासांना दिला. पुढे रामदास स्वामींनी याच आशीर्वादाने अकरा ठिकाणी मारुतींची स्थापना केली. ती मंदिरे सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात आहेत. त्या वेळच्या कठीण परिस्थितीत समाजाला तोंड देण्यासाठी वीर मारुतीची अत्यंत आवश्यकता आहे हे समर्थांना जाणवले.ही प्रेरणा केंद्रे ,ऊर्जा केंद्रे होऊ शकतात.. बलभीम वीर मारुती सारखे शरीर प्रकृती पिळदार व शक्तिमान असणे अत्यंत आवश्यक आहे तरुणाईसाठी . शक्ती व युक्ती या दोन गोष्टींनी कोणतेही यश प्राप्त करता येते. रामदास स्वामींची दूरदृष्टी नक्कीच येथे दिसून येते.

आता रामदास स्वामीनी हे अकरा मारुती कोठे कोठे स्थापन केले ते पहा.

पहिले दोन चाफळ मध्ये आहेत. चाफळच्या राम मंदिरासमोर दास मारुती. तसेच मंदिराच्या पाठीमागे वीर मारुती उभा आहे,जो श्रीराम मंदिराचे व गावाचे संरक्षण करण्यास सतत सि द्ध आहे.

३)तिसरा शिंगणवाडीचा… चाफळ पासून दोन किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर हा खडीचा मारुती म्हणून ओळखला जातो.येथे, समर्थांना झालेल्या शुभ संकेतामुळे, स्वप्नात रामचंद्राचे दर्शन झाल्याने, तसेच मानस पूजेत मारुतीरायाचे दर्शन यामुळे त्यांना या ठिकाणी मारुती मंदिर उभे करावे असे जाणवले.येथेच शिवरायांची व त्यांच्या भेटीगाठी झाल्या व शिवरायांना त्यांनी अनुग्रह दिला. येथील खडीचा मारुती हा महाराष्ट्राला प्रेरणादायक आहे.

४)चौथा माजगावचा.चाफळ, उंब्रज रस्त्यावर २किलोमीटरवर अंतरावर. येथे लोकांनी एका धोंड्यालाच गावाच्या वेशीवर मारुती केले होते पण समर्थांनी त्याच धोंड्याची हनुमंताची मूर्ती घडवून मारुतीचे मंदिर उभे केले व प्रतिष्ठापना केली.

५) पाचवा उंब्रजचा. कराड पासून 20 किलोमीटर अंतरावर. तारळी नदी व मांड नदी या दोन्ही कृष्णा नदीस येथे मिळतात. अशा सुरेख संगमावर मारुतीची स्थापना समर्थांनी केली व मठ उभा केला. कल्याण स्वामी व त्यांचे शिष्य केशव स्वामी हे या मठाचे अधिपती होते. येथे केशव स्वामींची समाधी आहे.

६) सहाव्वा शहापूर येथील. उंब्रज पासून साडेसहा किलोमीटर वर हे गाव येते. येथील बाजी कुलकर्णी यांच्या घरी समर्थ गेले असता त्यांना विजापूरच्या बादशहाने तुरुंगात टाकले आहे हे कळले. समर्थांनी त्यांची सुटका करण्याचे काम केले व त्या कुटुंबात हनुमंताची मूर्ती भेट दिली प्रसाद म्हणून. पुढे येथे मंदिर उभे राहिले व राम जन्मोत्सव व मारुतीरायाचा उत्सव जोरात सुरू केला या कुटुंबाने.

७) सातवा मसूरचा.. उंब्रज च्या पूर्वेस तीन किलोमीटर अंतरावर कराड जवळ असलेले हे गाव. येथे 1645 च्या दरम्यान राम जन्मोत्सव सुरू झाला व मारुतीरायांची स्थापना झाली. येथेच मंबाजी या शिष्यगणाचे नाव कल्याण ठेवण्यात आले. ज्या विहिरीत बसून समर्थांनी मुंबाजीला अनुग्रह दिला व कल्याण नामकरण केले ती विहीर आजही पाहण्यास मिळते.

८)बहे… मसूर येथील मारुतीरायाचे दर्शन घेतल्यावर आपण कराड कडे येतो व कार्वे मार्गे नरसिंगपूर मार्गे बहे येथे जातो. हे गाव कृष्णा नदीच्या किनारी सांगली जिल्ह्यात येते. येथील मारुती बाहू पसरून उभा आहे. बहे हे एक बेट आहे व तेथे खूपच काळेभोर खडक आहेत पाण्याच्या क्षेत्रात. लंके होऊन परत येताना प्रभू रामचंद्र काही काळ बहे येते वास्तव्यास होते. त्यावेळी स्नान,संध्या  व ध्यान व समाधी करण्यात मग्न असलेल्या श्रीरामांना कृष्णामाई खूप वेगात  भेटण्यास येऊ लागली. तिला थोपवण्यासाठी, हनुमंताने आपले दोन्ही बाहू पसरले व तिला शांतपणे जायला सांगितले. अशी पण ही आख्यायिका आहे. म्हणून हे बाहूचे बहे गाव झाले. येथे श्रीराम येऊन गेले म्हणून हे गाव, क्षेत्र खूप पुण्यवान आहे.. येथे समर्थ रामदास स्वामींनी मारुतीची स्थापना केली आहे. हे खूप सुंदर बेट आहे येथे वानरांची खूप गर्दी असते झाडांवर.

९) बत्तीस शिराळा ,सांगली जिल्हा,येथे सुंदर वीर मारुतीची मूर्ती ची स्थापना समर्थांनी केली आहे. हे गाव नागपंचमी सणासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.तसेच नाथपंथाचे पण हे गाव केंद्र आहे.

१०) पारगाव…कोल्हापूर जिल्हातील वारणा नदीकिनारी जुने पारगाव येथे वीर मारुतीची स्थापना समर्थांनी केली आहे. मंदिर खूप छान आहे. याची देखभाल मराठा कुटुंबाकडे आहे.

११)मनपाडळे…. कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळगड शेजारी वारणे काठी मन पाडळे या गावी समर्थांनी मारुतीची स्थापना करून येथे रामदास मठ केला आहे. याची सर्व देखभाल करण्याची व्यवस्था जयराम गोसावी कुटुंब यांच्याकडे आहे.

अशा या 11 मारुतींची स्थापना समर्थांनी इ.स.१६४४तेइ.स.१६५४ या कालावधीत केलेली आढळून येते. “समर्थ प्रताप” लिहिणारे गिरीधर स्वामी,व समर्थांच्या बखरी लिहिणारे हनुमंत स्वामी यांच्या लिखाणात सुद्धा समर्थांनी स्थापित केलेल्या या अकरा मारुतींचा उल्लेख आहे..ही मंदिरे म्हणजे ही ऊर्जा केंद्रे  तत्कालीन राजकीय परिस्थितीत स्वातंत्र्यसंग्रामातील  लढ्यासाठी समाजाला उपयुक्त व आधार देणारी नक्कीच  होती. समर्थ रामदास स्वामींनी केलेली श्री मारुतीरायाची आरती सुद्धा अतिशय प्रेरणादायी व जोशपूर्ण आहे.

“भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती | वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना,….हे समर्थांनी रचलेले संकट नाशक  स्तोत्र  म्हणताना खरच प्रत्यक्ष मारूती राया आपल्या पाठीशी उभे आहेत हे जाणवते. “अणू पासून ब्रम्हांडा”एवढा होत जाणा-या मारूतीचे…..११ श्रीमारूती रायांचा दर्शन लाभ अवश्य करावा.

सौ.माधुरी कुलकर्णी, कराड.

समिति संवाद – पश्चिम महाराष्ट्र प्रांत

Leave a Comment